डुग्गीपार पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल
गोंदिया, ब्युरो.आमगाव तालुक्यात नायब तहसीलदार आणि वन कर्मचाऱ्याला रेती माफियांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता सडक अर्जुनी तालुक्यात बुधवारी रेतीमाफियांनी तलाठ्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली.
सडक अर्जुनी तालुक्यातील तलाठी किशोर ऋषी सांगोडे (वय 51) हे बुधवारी घाटबोरी तेली परिसरात गस्तीवर होते. दरम्यान एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये चुलबंद नदीपात्रातून रेती भरून जात असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबवून जप्तीचा पंचनामा करीत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. दरम्यान आरोपी किशोर दामोधर शिवणकर (वय 36, रा. परसोडी) याने रस्त्यातच हायड्रोलिकने ट्रॉली वर उचलून रेती रिकामी केली.
त्यानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करून तलाठ्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून पसार झाला. काही वेळाने ट्रॅक्टर मालक टिकेश अशोक फुंडे हा दुचाकीने आला आणि पेचकसने ट्रॅक्टर चालू करीत असताना तलाठ्याने ट्रॅक्टर नेऊ नको, असे म्हटले. त्यावर आरोपी टिकेशने तलाठी किशोर सांगोडे यांना तुम्ही मधात याचचे नाही, नाही तर माझ्या हाताने काहीही होऊन जाईल, असे म्हणत ठार मारण्याची धमकी देत ट्रॅक्टरसह निघून गेला. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश सरोटे करीत आहे.
गोंदिया, ब्युरो. रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडलेल्या लहान भावावर मोठ्या भावाने कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव मुंडीपार येथे घडली.
घटेगाव मुंडीपार येथील हिंमत उमराव शेंडे (वय 43) हा गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास भोजन करून घराजवळील किराणा दुकानात खर्रा घेण्यासाठी जात होता. दरम्यान त्याच्याच घराशेजारी राहणारा मोठा भाऊ लालचंद उमराव शेंडे (वय 45) याने मागून येऊन हिंमतवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात त्याला कमरेखाली गंभीर जखम झाली. दरम्यान त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गोंदिया येथे हलविण्यात आले. तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहे.
शेतातून ट्रॅक्टर घरी घेवून जाताना घडली घटना
नवेगावबांध: शेतातील ट्रॅक्टर घरी घेऊन जात असताना तलावाच्या पाळीवरून उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावराटोला येथे घडली. दुर्योधन चारमल सोनवाने (२९) रा. सावरटोला असे मृतकचालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सावरटोला येथील शेतकरी किशोर तरोणे यांच्या मालकीचा नवीन ट्रॅक्टर चालक दुर्योधन सोनवाने हा शेतातून घरी घेवून जात होता. शेतातून पांदण रस्त्याने ट्रॅक्टर काढून, सरळ तलावाच्या पाळीने घराच्या दिशेने निघाला. परंतु ट्रॅक्टरचे संतुलन बिघडून ट्रॅक्टर तलावाच्या पाळीवरून शेतात कोसळला. यातच दुर्योधनचा मृत्यु झाला.
अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पाठविला. मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणाचा तपास अर्जुनी मोरगाव पोलिस करीत आहे.
सोनवाने कुटुंबीयांवर कोसळले संकट
सावराटोला येथील चारमल सोनवाने यांचा दुर्योधन हा एकुलता एक मुलगा या दुर्दैवी अपघातात शुक्रवारी ठार झाला. त्यामुळे सोनवाने कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. दुर्योधनच्या मृत्यूने सावरटोला गावावर शोककळा पसरली होती. दुर्योधनच्या पश्चात आई-वडील व २ बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. .
गोंदिया : गोंदिया : शेतीच्या वादातून चुलत भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम खैरीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेदरम्यान घडली, आरोपी उमेश भगवान पुराम (२४) या तरुणाने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरीटोला येथील वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना आरोपी चुलतभाऊ उमेश भगवान पुराम (२४) हा मोटारसायकल घेऊन बिरसा मुंडा पुतळ्याजवळ आला. हातात तलवार घेऊन तो लालचंद बळीराम पुराम (३८) यांच्या दिशेने धावला. मात्र, तलवार विश्वास शिवकुमार तुमसरे याने हिसकावली असता तो पुन्हा २० मिनिटांनी चाकू घेऊन आला आणि लालचंद यांच्यावर मागून हल्ला केला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मालगाडीसमोर घेतली उडी : गुदमा येथील घटना
गोंदिया : निद्रानाशाच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीने मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. गोंदिया ते गुदमादरम्यान असलेल्या डाऊन रेल्वे लाइनवर शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी ६:०५ वाजता दरम्यान ही घटना घडली. मृताचे नाव मोहनलाल हेमराज हेमणे (५६, रा. दत्तोरा) असे आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहनलाल यांना मागील तीन वर्षांपासून त्यांना झोप येत नव्हती. यासाठी त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतला. तरीही देखील त्यांना झोप येत नसल्यामुळे त्यांनी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता
त्यांनी गोंदिया ते गुदमादरम्यान असलेल्या डाऊन रेल्वे लाइनवरील मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली. निखिल मोहनलाल हेमने (२४, रा. दत्तोरा) यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार बोहरे करीत आहेत.
गोंदिया : दारू देत नाही या कारणावरून घरात शिरून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम डांगोर्ली येथे २३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता दरम्यान घडली.
फिर्यादी गजानन अनंतराम मेश्राम (४१, रा. डांगोर्ली) हे पत्नी व मुलासह जेवण करीत असताना आरोपी मदन रंगलाल पाचे (४०, रा. डांगोर्ली) हा त्यांच्या घरात शिरला. त्याने मला दारू देत नाही यावरून घरातील सामान फेकफाक करून गजानन मेश्राम यांना धक्काबुक्की केली व गालावर थापड मारली. तसेच शिवीगाळ करून मला दारू दिली नाही तर ४-५ लोकांना बोलावून तुम्हाला मारून टाकील अशी धमकी दिली. पोलिसांनी प्रकरणी भादंवि कलम ४५२, ३२३, ४२७, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.